प्र चा प्रवास....


.....तर ९ मे उजाडला आणि माझ्या एकल प्रवासाचा पडदा हळूहळू खाली यायला लागला होता. आता पुढचा प्रवास बऱ्याच जणांबरोबर करायचा होता.
आदल्या दिवशी रतीला जिथे Airbnb मध्ये सोडले होते, तिथे तिला घ्यायला मी परत गेले. (तोपर्यंत मी स्वतःला हेलसिंकीची अर्धी लोकल आणि पूर्ण "प्रो ट्रॅव्हलर" समजू लागले होते. 😜)
अर्थातच ते Airbnb Helsingin Rautatieasema (म्हणजेच हेलसिंकी सेंट्रल रेल्वे स्टेशन) जवळच होते.
या रेल्वे स्टेशनची खासियत म्हणजे त्याची अप्रतिम वास्तू. ते रेल्वे स्टेशन कमी आणि एखाद्या भव्य वास्तुकलेच्या प्रदर्शनातील मानाचा नमुनाच वाटत होते. म्हणूनच त्याबद्दल माहिती हवीच होती. अर्थातच माझा जुना मित्र "गूगलेश्वर" मदतीला धावून आला. 😄
प्रसिद्ध वास्तुविशारद एलियेल सारिनेन यांनी डिझाइन केलेली आणि १९१९ मध्ये सुरू झालेली ही वास्तू Art Nouveau आणि National Romantic शैलीतील जगप्रसिद्ध कलाकृती मानली जाते. मुख्यतः फिन्निश ग्रॅनाइटपासून बांधलेल्या या स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक भलीमोठी कमानीदार खिडकी आहे. तिच्या दोन्ही बाजूंना हातात गोलाकार दिवे धरलेले चार भव्य दगडी पुतळे—Lantern Bearers—उभे आहेत.
हेरंब सर म्हणाले होते, "त्यांच्या चेहऱ्यावर चार वेगवेगळे रस दिसतात."
मी मात्र कितीही बारकाईने पाहिलं तरी मला चारही जण "एकाच मूडमध्ये ड्युटीवर उभे" असल्यासारखेच वाटले! 😄
        हातात गोलाकार दिवे धरलेले चार भव्य दगडी पुतळे—
                        Lantern Bearers
पण एक गोष्ट मात्र खरी... अंधार पडल्यानंतर त्या दिव्यांच्या प्रकाशात हे शिल्पसमूह विलक्षण देखणे दिसतात.
मी रतीकडे पोहोचले तेव्हा तिचाही निवांत आराम झाला होता. ब्रेकफास्ट उरकून ती तयारच बसली होती. तिचं चेक-आऊट करून सामान तिथेच ठेवून आम्ही फिरायला बाहेर पडलो. तोवर साडेअकरा वाजले होते.
तिच्या हॉटेलसमोरच्या चौकात अगदी आपल्या आठवडी बाजारासारखे अनेक स्टॉल लागले होते. लोकरीच्या कानटोप्या, स्वेटर, ड्रायफ्रूट्स, छोटी खेळणी, शूज, फुले... रोजच्या वापरातील कितीतरी वस्तू तिथे होत्या.
पण आमचं लक्ष वेधून घेतलं ते फुलांच्या स्टॉलने!
गुलाब, ट्युलिप, लिली... किती म्हणून सांगू! नाना रंगांची, वेगवेगळ्या आकारांची आणि मंद सुगंध दरवळणारी असंख्य फुलं... जणू निसर्गाने रंगपेटीच उघडून ठेवली होती.

फोटो... व्हिडिओ... पुन्हा फोटो... पुन्हा व्हिडिओ...आम्ही दोघी त्या रंगोत्सवात बराच वेळ हरवून गेलो.
फुलांच्या किमती पाहिल्या आणि मनात म्हटलं...
"फुलांवर प्रेम दूरूनच करावं... ती गुलदस्त्यातच जास्त शोभून दिसतात!" 😄
कधी एखाद्या वस्तूची किंमत विचारत होतो, कधी मजेत "थोडं स्वस्त द्या ना!" अशी ऑफर देत होतो... आणि गप्पा मारत मारत बाजारातून बाहेर पडलो.
जवळच फिनलंडचं संसद भवन आहे, असं आमच्या हॉटेलमधल्या गप्पिष्ट रिसेप्शनिस्ट लॉराने सांगितलं होतं. मग तिकडेच मोर्चा वळवला.रस्त्यात एक बोटीसारखी दिसणारी इमारत दिसली.
मनात विचार आला...
"हे काय बरं आहे? जाऊन बघू का?"
पण तेवढ्यात रतीला तिच्या भारतातल्या मैत्रिणींचा फोन आला. ती जवळच्या बाकावर निवांत बसून बोलू लागली.
मग मीही आजूबाजूच्या परिसरात निवांत फेरफटका मारला. वाटेत दिसेल ते सौंदर्य कॅमेऱ्यात टिपत राहिले. ह्याच काही फोटो, काही व्हिडिओ मध्ये होत्या भरपूर आठवणी!
खरं तर माझ्या प्रवासाचा हेतू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी धावत जाऊन "पाहिले" म्हणून यादीत टिकमार्क करणे हा नव्हताच. मला प्रत्येक ठिकाणाचा इतिहास ऐकायचा होता. त्या वास्तूंचा स्वभाव समजून घ्यायचा होता. स्थानिक लोकांशी दोन शब्द बोलून त्या जागेचा आत्मा अनुभवायचा होता. प्रवास माझ्यासाठी फक्त अंतर पार करण्याचं साधन नाही आहे; तर माणसं, संस्कृती आणि स्वतःला नव्याने भेटण्याचा एक लाइफटाइम संधी बनली.
.... तिथेच समोर हेलसिंकी म्युझिक सेंटर—किंवा फिन्निश भाषेत ज्याला 'मुसिकितालो' म्हणतात—दिसलं.
म्हटलं, "चला, इथे काय आहे तेही बघूया!"
पण आमच्या नशिबात बहुतेक त्या दिवशी फक्त बाहेरूनच सगळ्या जागांचे दर्शन होतं. कारण आम्ही पोहोचलो तेव्हा इमारत डागडुजीसाठी बंद होती.
मी मात्र बाहेर उभी राहून इंग्रजी मधला माहितीफलक वाचायला सुरुवात केली. (आणि हा..चोंबडेपणा नाही ....माहिती मिळण्याची जिज्ञासा म्हणू या हव तर 😄)
मुसिकितालोमध्ये साधारण तीस मिनिटांची मार्गदर्शित सफर असते. हेलसिंकीच्या सांस्कृतिक जीवनाचं केंद्र मानल्या जाणाऱ्या या वास्तूमध्ये संगीत कार्यक्रम, कॉन्सर्ट्स आणि अनेक कलात्मक उपक्रम वर्षभर सुरू असतात.
टूरची सुरुवात बाहेरच्या चौकातूनच होते. तिथे म्युझिक हॉलची ओळख करून दिली जाते आणि समोर उभ्या असलेल्या 'लाउलुपुत' या आगळ्यावेगळ्या शिल्पाकडे लक्ष वेधलं जातं.
साधारण तेरा मीटर उंचीच्या ॲल्युमिनियम आणि स्टीलच्या त्या रचना पाहताना त्या नेमक्या काय दर्शवतात, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

लाउलुपुत....तेरा मीटर उंचीची मेटॅलिक रचना 

नंतर वाचल्यावर कळलं [अर्थातच गूगलश्वर वर] की त्या शिल्पात फिनलंडचा निसर्ग आणि संस्कृती गुंफलेली आहे. कुठे रचलेल्या लाकडांचे ढिग दिसतात, कुठे ग्रँड पियानोची झाकणं, तर कुठे तोंड उघडून  गाणारा एखादा महाकाय मासाच जणू स्वर लावत उभा आहे!
त्यानंतर ही सफर इमारतीच्या आत जाते. सभागृहं, कॉन्सर्ट हॉल, आधुनिक वास्तुरचना आणि तिथला भव्य ऑर्गन पाहायला मिळतो....
थोडक्यात काय... आम्ही या भारी अश्या टूरला मुकलो होतो!
मनात मात्र एक छोटासा विचार आला...
"प्रत्येक प्रवासात काहीतरी मुद्दाम हुकत असावं... म्हणजे पुन्हा त्या शहरात परत यायला एक तरी कारण उरतं!"
 [ वेड्या मनाची, वेडी आशा!!] 
त्यानंतर आम्ही रस्ता ओलांडून संसद भवनाच्या दिशेने निघालो. मुख्य रस्त्याखालचा अंडरपास निवडला. त्या मार्गावर फक्त पादचारी आणि सायकलस्वारांनाच परवानगी होती. एक गोष्ट मात्र सतत जाणवत होती...
गाड्यांची गर्दी नाही, हॉर्नचा गोंगाट नाही, धावपळ नाही...प्रत्येक जण आपापल्या गतीने चालत होता आणि तरीही कुणीच कुणाच्या आड येत नव्हतं. 
पार्लियामेंटसमोर पोहोचलो. आणि,अर्थातच...फोटो काढले! (शास्त्र असतं ना ते! 😜)

  फिनलॅन्डचे पार्लियामेंट...
खरंतर आत जाता येतं, पण त्यासाठी आधी ऑनलाइन बुकिंग किंवा वॉकिंग टूरचा भाग असणं आवश्यक असतं.
आम्ही दोन्हीपैकी काहीच केलं नव्हतं. [आणि मी स्वतःला प्रवासाला, त्याचे नियोजन करण्याला, मी pro झालेय असे समजू लागले होते..स्वतःबद्दलच्या भ्रामक कल्पना दुसरे काय...प्रवास जसा आत्मविश्वास वाढवतो तसा कधीतरी अशी स्वतःतल्या उणिवांची जाणीव ही करून देतो....तर असा फुटला माझा स्वतःबद्दलचा भ्रमाचा भोपळा.....असो....पण कितीही ठरवले तरी काही प्लॅनिंग करणे राहून जाते एवढे खरे...]
तर बुकिंग नव्हते म्हणून बाहेरूनच त्या भव्य वास्तूला मनसोक्त न्याहाळलं आणि पुढे निघालो. समोर शुभ्र कॅथेड्रल खुणावत होतं. दिसायला अगदी जवळ.......पण चालायला मात्र बरंच लांब! ते म्हणतात ना...
"प्रवासात डोळ्यांना जवळ वाटणाऱ्या गोष्टी पायांना नेहमीच थोड्या दूर जाणवतात ."
तिथे पोहोचेपर्यंत आजूबाजूचं छोटंसं उद्यान, टुमदार घरं आणि कानात भरून राहिलेली निःशब्द शांतता मनात घर करून बसली होती. तेवढ्यात थोडा स्मोकीं सुगंध दरवळला...तिथल्या एका छोट्याशा रोल्सच्या दुकानामधून तो येत होता  ...मग तिथे थांबलो. वडील आणि मुलगा मिळून दुकान सांभाळत होते.
आम्ही शाकाहारी काही मिळतं का विचारलं.
"फलाफल रोल मिळेल..." त्यांनी हसत सांगितलं. मग सुरू झाली नेहमीची ओळख परेड ...
"भारतातून आलात?"
"कोणत्या शहरातून?"
"किती दिवस?"
"कशासाठी ?" 
"काय  पाहीलेत ?"
हे प्रश्न विचारताना वडील अगदी उत्साहात होते.मुलगा मात्र त्यांना फिन्निशमध्ये काहीतरी म्हणत होता.
मी हसत विचारलं,  "तुमचा  मुलगा तुम्हाला एवढे प्रश्न विचारू नका असंच सांगतोय ना?"
ते मनापासून हसले.मग म्हणाले,
"जगात कुठेही गेलीस तरी यात बदल नाही! तुला मुलगा आहे का?"
मी "हो" म्हणताच त्यांनी पुढचा डायलॉग टाकला...
"सगळ्या मुलांना वाटतं, त्यांना सगळं कळतं... आणि त्यांच्या वडिलांना काहीच कळत नाही!"
क्षणभर मला माझे बाबा आठवले...तेही अगदी असंच म्हणायचे.
मीही हसत उत्तर दिलं,
"काका, पृथ्वी गोल आहे... मग अनुभवही सारखेच असणार ना! देश बदलतात, भाषा बदलतात; पण मुलं आणि बाबांचं नातं मात्र जगभर एकसारखंच असतं."
आम्ही सगळेच हसायला लागलो.तेवढ्यात घरून फोन आला.....त्या काकांना बाय केलं... आणि मनात एक छानशी आठवण साठवत आम्ही फोन वर बोलत पुढे निघालो.
पुढे चालत गेल्यावर एक छोटीशी टेकडी दिसली. एखाद्या मोठ्या पर्यटनस्थळासारखी नाही, पण जणू शहराच्या गडबडीत शांतपणे विसावलेला एक छोटासा कोपरा.
छोट्या-छोट्या दगडांवरून चढत आम्ही एका मोठ्या खडकावर जाऊन बसलो.
तिथून दिसणारे रस्ते, दुतर्फा उभी असलेली झाडं, अधूनमधून जाणाऱ्या गाड्या... सगळंच एखाद्या पोस्टकार्डावर छापलेल्या चित्रासारखं दिसत होतं.
थोडी भूक लागली होती. सॅकमधला थोडाफार खाऊ बाहेर काढला. खात होतो, गप्पा मारत होतो, एकमेकींना जाणून घेत होतो आणि समोर पसरलेलं दृश्य मनात साठवत होतो.
जवळच एक कुटुंब रविवारचा निवांत दिवस साजरा करत होतं. सतरंजी अंथरलेली, त्यावर खाऊच्या पिशव्या, एक जण आरामखुर्चीत निवांत बसलेला, बाकीचे गप्पांमध्ये रमलेले...
त्यांना पाहताना लहानपणी गेलेली सारसबाग आठवली...वाटलं...
'आनंदाला फार मोठी कारणं लागत नाहीत; माणसं आपली असली की एखादी सतरंजीही पिकनिक बनते.'
आम्ही एकमेकींचे फोटो काढत होतो. पण दोघींचा एखादा फोटो मेमरी म्हणून असावा म्हणून मग त्यांनाच आमचा एक फोटो काढायला सांगितला.
त्यांनीही अगदी हौसेने...
"थोडं उजवीकडे..."..."आता हसा..."....."अजून जवळ उभं रहा..."
अशा सूचना देत आमचा फोटो काढला.
रती आणि मी 
थोड्याशा गप्पा झाल्या, एकमेकांना हसत "बाय" केलं आणि आम्ही पुढे निघालो.
रतीला अचानक आइसक्रीम खायची इच्छा झाली.
म्हणून जवळच्या सुपरमार्केटमध्ये शिरलो.
एवढ्या गार हवेत आइसक्रीम खाण्याची मजा तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.(अर्थात... तिच्यासाठी! 😄 मी मात्र चक्क त्या मोहाला बळी पडले नाही.)

 गार हवेत आइसक्रीम खाण्याची मजा अनुभवणारी रती !

तिथून आम्ही जवळच्या सार्वजनिक वाचनालयाच्या दिशेने निघालो.चालत चालत.....बोलत बोलत...आणि अचानक समोर उभं राहिलं.....शुभ्र, देखणं... Helsinki Cathedral! दूरूनच नजरेत भरावं असं ते पांढरंशुभ्र चर्च!
फिन्निश भाषेत Helsingin Tuomiokirkko म्हणून ओळखलं जाणारं हे हेलसिंकीचं सर्वात प्रसिद्ध प्रतीक.
सेनेट स्क्वेअरच्या मध्यभागी उभ्या असलेल्या या भव्य वास्तूचं डिझाइन कार्ल लुडविग एंजेल यांनी केलं आणि १८५२ मध्ये ती पूर्ण झाली.
फिनलंडमधील नव-अभिजात (Neo-Classical) वास्तुकलेचा हा उत्कृष्ट नमुना मानला जातो. इतकंच नाही, तर हेलसिंकीचं ओळखचिन्ह म्हणूनही त्याकडे पाहिलं जातं.
(हे अर्थातच... हेरंब सरांच्या माहितीच्या खजिन्यातून! 😄)
समोरचं प्रशस्त चौक, मधोमध उभा असलेला पुतळा आणि कॅथेड्रलकडे जाणाऱ्या त्या भव्य पायऱ्या...
संपूर्ण परिसरात एक वेगळीच प्रसन्नता भरून राहिली होती.
नंतर हेरंब सरांनी सांगितलं की, इथे वर्षभर विविध सार्वजनिक कार्यक्रम, ख्रिसमस मार्केट, फूड फेस्टिव्हल्स आणि अनेक सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले जातात.
त्या शुभ्र पायऱ्यांवर बसून कितीतरी लोक निवांत गप्पा मारत होते. आम्हीही त्या सौंदर्याचा आस्वाद घेत होतो...
आणि तेवढ्यात.....सहज म्हणून जीन्सच्या खिशात हात घातला...आणि...माझे तिथे ठेवलेले डेबिट कार्ड गायब!!
क्षणभर अक्षरशः हृदयाचा ठोका चुकला.
"अरे देवा... आता हे काय नवीन?" लगेच पायरीवर बसले.
आणि संपूर्ण सॅक पालथी घातली. 😄
रती माझ्याकडे शांतपणे पाहत होती.सॅक तपासली....पुन्हा तपासली.....आणखी एकदा तपासली...पण कार्ड काही सापडलं नाही.
मग आम्ही ज्या रस्त्याने आलो होतो, तो सगळा रस्ता परत चालत शोधायला सुरुवात केली.मनात विचार...
"घरी सांगण्यापूर्वी... (आणि बोलणी खाण्यापूर्वी! 😜) एकदा तरी नीट शोधून बघू."
पण...कार्ड काही सापडलं नाही...शेवटी आधी कार्ड ब्लॉक केलं...आणि मग घरी फोन लावला.
मनातला अपराधीपणा लपवतच सांगितलं..."कार्ड हरवलं..."
क्षणभर शांतता...मग वल्लभचा नेहमीसारखा शांत आवाज...
"आधी ब्लॉक कर."मी म्हणाले....."केलं ऑलरेडी."
तेवढ्यात मुलगा म्हणाला..."मम्मा, मग टेन्शन कशाला? फॉरेक्स कार्ड आहे,  कॅश आहे ना! आता फक्त पुढे हे दोन्ही नीट सांभाळ."
फोन ठेवला...आणि मनात मात्र एक वेगळाच विचार सुरू होता.
प्रश्न पैशांचा नव्हताच....प्रश्न होता...इतक्या सुरळीत चाललेल्या माझ्या एकल प्रवासाला लागलेल्या त्या छोट्याशा गालबोटाचा.
पण...प्रवासही शिक्षकासारखाच असतो.
तो प्रत्येक छोट्या चुकीतून आपल्याला पुढच्या प्रवासासाठी एक नवीन धडा शिकवून जातो.
त्या दिवसानंतर मात्र माझ्या प्रत्येक वस्तूची मोजदाद दिवसातून किमान दहा वेळा व्हायला लागली! 😄
मग स्वतःलाच समजावत पुन्हा चालायला सुरुवात केली.
कधी एखाद्या उद्यानातून...कधी समुद्रकिनाऱ्यालगतच्या रस्त्याने...निवांत चालत चालत आम्ही पुढे निघालो.
थोड्याच अंतरावर "Taste of India" हे भारतीय रेस्टॉरंट दिसलं.आत पाऊल टाकताच रतीच्या चेहऱ्यावरचं समाधान बघण्यासारखं होतं.जणू काही हजारो किलोमीटर दूर असलेल्या भारताने तिला तिथेच मिठी मारली होती!ती सरळ खुर्चीवर मांडी घालून बसली आणि म्हणाली, "आता बरं वाटतंय!" 😄
टेस्ट ऑफ इंडिया ....तिथे डाळ रोटी पण भारी वाटली खायला!

आम्ही मनसोक्त जेवलो. थोडं पार्सलही घेतलं.बाहेर पडलो तेव्हा उजेड तसाच होता. युरोपमध्ये मे महिन्यात दिवस इतके मोठे असतात की संध्याकाळ कधी रात्र होते, याचा अंदाज येत नाही.
घड्याळाकडे पाहिलं...आणि लक्षात आलं—अरे! रात्र तर कधीचीच झाली होती!
जेवण उरकून आम्ही पुन्हा रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघालो.रतीचं सामान तिथून घेतलं आणि कम्यूटर ट्रेन पकडून आमच्या हॉटेलकडे निघालो.दिवसभर एवढं चाललो होतो, तरी आश्चर्य म्हणजे थकवा जाणवत नव्हता. उलट मन अजूनही दिवसभरात पाहिलेल्या प्रत्येक दृश्यात रेंगाळत होतं.प्रवासाची ही एक गंमत असते...शरीर थकतं, पण मन मात्र नव्या अनुभवांच्या उर्जेने आणखी ताजंतवानं होतं.
हॉटेलमध्ये पोहोचलो, चेक-इन केलं आणि रूममध्ये शिरताच एक मोठा नि:श्वास टाकला."अरे वा... आता थोडा आराम!"
फ्रेश होऊन निवांत गप्पा मारत बसणार, इतक्यात रतीला अचानक आठवलं..."अगं! CCE कडून मिळणारं कॉन्फरन्सचं किट घ्यायचं आहे!"ग्रुपमध्ये महाजन सरांचा संदेश आलेला होता.ते हॉटेलमध्ये पोहोचले होते आणि रतीला तिचं किट घेऊन जायला सांगितलं होतं."चल, आत्ताच जाऊन येऊ!"
दोघीही लगेच त्यांच्या रूमकडे निघालो.पहिलीच भेट...
पण काही माणसं अशी असतात ना...
दोन मिनिटांतच आपलेपणाची भावना निर्माण करतात.
महाजन सर आणि मॅडम यांच्याशी काही मिनिटं गप्पा मारल्या...सर आर्किटेक्ट आणि मॅडम गणिताच्या प्राध्यापिका दोघेही उत्तम चित्र काढणारे..त्याच्याशी बोलताना जाणवलं—
ही माणसं केवळ अभ्यासू नाहीत; तर विचारांनीही समृद्ध आहेत.... त्यांच्या बोलण्यात अनुभव होता....साधेपणा होता.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे... शिकण्याची आणि शिकवण्याची विलक्षण ओढ होती.
माझ्या मनात त्या क्षणी एक वेगळाच विचार आला....खरं तर मी हा एवढा मोठा प्रवास फक्त फिनलंड बघण्यासाठी केला नव्हता. CCE च्या परिषदेत सहभागी होणं हा त्याचा एक भाग होता; पण त्याहून मोठं उद्दिष्ट होतं—
नवीन माणसं भेटणं...
त्यांच्या विचारविश्वात डोकावणं...
त्यांच्यातली सर्जनशीलता अनुभवणं...
सृजनशील प्रयोगांची माहित करून घेण्याबरोबर त्यामागची शिक्षकांची संकल्पना, शैक्षणिक दृष्टिकोन आणि त्याच्या अमलबजावणी करतानाची प्रक्रिया समजून घेणे ,
आणि प्रत्येकाकडून काहीतरी नवीन शिकत स्वतःलाही थोडंसं अधिक समृद्ध करणं....
महाजन सर आणि मॅडम ह्यांच्यासारख्या सहभागीची भेट परिषदेची जणू मंगल सुरुवात होती.मनात एक गोड उत्सुकता निर्माण झाली.
"जर सुरुवात एवढी छान असेल... तर पुढचे चार दिवस किती सुंदर असतील!"
त्या विचारानेच चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं.रूमवर परतलो. दुसऱ्या दिवसाची तयारी केली...कपडे नीट करून ठेवले...बॅग आवरली...अलार्म लावला...
(हो... कार्ड हरवल्याच्या प्रसंगानंतर सगळं तीनदा तपासलं! 😄)
मग अजून थोड्या गप्पा...थोडं हसणं...थोडी उद्याच्या कार्यक्रमाची चर्चा...आणि मग...
उत्सुकता, आनंद, थोडी धाकधूक आणि खूप साऱ्या अपेक्षा मनात घेऊन आम्ही दोघी झोपेच्या स्वाधीन झालो.
९ मेचा दिवस मला हेलसिंकीची आणखी काही सुंदर ठिकाणं दाखवून गेला; पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे, त्याने मला काही सुंदर माणसं भेटण्याची चाहूल दिली. प्रवासाचा खरा उत्सव दुसऱ्या दिवसापासून सुरू होणार होता... आणि त्या उत्सवाची ही शांत, सुंदर नांदी नक्किच होती.!!

Comments

  1. मस्तच

    ReplyDelete
    Replies
    1. प्रगती जोशीAugust 6, 2026 at 10:18 AM

      धन्यवाद 🙏

      Delete
  2. Replies
    1. प्रगती जोशीAugust 6, 2026 at 10:18 AM

      आभार 🙏

      Delete
  3. खूप छान गं..पुढे वाचायची उत्सुकता आहे 😃 लवकर लिही

    ReplyDelete
    Replies
    1. प्रगती जोशीAugust 6, 2026 at 10:19 AM

      हो नक्किच, प्रयत्न तोच आहे! मनापासून आभार!

      Delete
  4. जिंदादिल आणि मनमोकळ प्रवासवर्णन!

    ReplyDelete
    Replies
    1. प्रगती जोशीAugust 24, 2026 at 5:34 PM

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

      Delete
  5. खूपच मस्त! हेलसिंकी फिरतोय इतक सुंदर लिहिल आहे.

    ReplyDelete
  6. प्रगती जोशीAugust 24, 2026 at 5:35 PM

    मनःपूर्वक धन्यवाद 🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

प्र चा एकल प्रवास.... एकला चलो रे ....

प्र चा एकल प्रवास....

प्र चा एकल प्रवास....पॅलेस,नोबेल प्राईझ म्युझियम, निळाई आणि मी!!