प्र चा प्रवास .......कला,कॉफी आणि प्रतीक्षा नवीन अध्यायाची !!
प्र चा प्रवास .......कला,कॉफी आणि प्रतीक्षा नवीन अध्यायाची !! हेलसिंकीमधल्या पहिल्याच रात्री स्वतः च्या घरी लागावी तशी गाढ झोप लागली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी एकदम टापटीप आवरून अस्मादिक नाश्त्याला वेळेवर हजर झाले. युरोपमध्ये सगळीकडे कॉल्ड ब्रेकफास्ट असतो हा अनुभव काही नवीन नव्हता. पण AX हॉटेलमध्ये नाश्त्याचा थाट बघून माझ्या मनातला खादाड भारतीय [ खर म्हणजे पक्का चवीने खाणारा पुणेकर] जागा झाला. पॅनकेक, त्याबरोबर तीन-चार प्रकारचे जॅम, सॅलड, त्यात घालण्यासाठी कच्च्या भाज्यांची फौज, अगदी छोट्या, बारीक तुकड्यांत कापलेलं पनीर, पाच-सहा प्रकारची ड्रेसिंग्ज, चार प्रकारचं चीज, क्रॉसाँ, वेगवेगळे ब्रेड आणि आपले आपण टोस्ट करून घेण्याची सुविधा! आपल्याकडे कसे "घे गं, अजून एखादे घे" म्हणत असतात; कोणीतरी मनापासून वाढत ह्या भावनेनेच चार घास जास्तं जाताना...आणि इथे मशीनच "ब्रेड माझ्या आत टाका आणि स्वतःच पाहिजे तसा आणि पाहिजे तेवढा स्वतःच भाजून घ्या" असं सांगत होतं. स्वावलंबनाचा पहिला धडा नाश्त्यापासूनच! सगळ्यात सुखद धक्का म्हणजे इथे दररोज मटारचे बॉल [तळून ठेवलेले असायचे] आणि छोल...