प्र चा एकल प्रवास....


12:21 AM (17 hours ago)
Gen Z' सारखं एकटं प्रवासाला जावं असा विचार अनेक वर्षे मनात घोळत होता....जाता येईल का पण एकटेच आपल्याला? हा विचार चमकून जायचाच मनात लगेच...[कारण मी जनरेशन X ना...त्यामुळे एकट्याने कुठेही जाण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र मिळून फिरण्यात धन्यता मानतो आम्ही...]
पण उगाचच एक आत्मविश्वास होता की, “अरे, यात एवढं अवघड काय असणार? हे करू शकतात तर आम्ही — ह्या Gen Z चे पालक का नाही करू शकणार?”
पण खरं सांगायचं तर “एकटीने प्रवास?” या कल्पनेवर माझ्यातली Gen X बाई आणि आतली adventurous- धाडसी [अति] यांच्यात रोजच वादविवाद चालू होते. 😄
आणि जेव्हा फिनलंडला सृजनशील परिषदेसाठी जाणं निश्चित झालं तेव्हा घरातील “स्वतंत्र गोलमेज परिषदेत” असीमने [माझ्या सुपुत्राने] फर्मान काढले की- "इतकी चांगली संधी परत परत येत नाही, त्यामुळे माझी काळजी न करता तिथे जायचेच " आणि वल्लभने तर नेहमीच्याच संयमाने सांगितले की-" मी नाही का कामासाठी वेगवेगळे देश फिरतो मग तुला काय झालय? आणि फक्त तिथेच जाऊ नकोस....फिर जरा तुझा comfort zone सोडून...एकटीने ! " 
झाले...मग ठरलं की फिनलैंड मधील परिषद सुरू होण्याआधी काही दिवस एकटीने पर्यटन करायचं आणि मगच परिषदेला जायचे...आणि मग खऱ्या अर्थाने एकल प्रवासाच्या विचाराला पंख मिळाले.
सुरुवातीला वाटलं — 'अगदी सोपं आहे....व्हिसा, तिकीट काढायचं, बॅग भरायची आणि निघायचं! एकदम सोप्पे आहे....'..तसंही अस्मादिकांकडे दुर्दम्य म्हणावा असा आत्मविश्वास आहेच.🫣 [खरं म्हणजे नको तेवढा आहे आणि कधीतरी घातक वाटणारा ओव्हरच आहे.....]आणि काही वाटले तर गूगलेश्वर आहेच मदतीला!! Google Maps वर पूर्ण द्रुढ विश्वास… ( खरं तर पुण्यात काही गल्यांमध्ये खुपदा U-turn घेतले आहेत त्याच्यामुळे मी! पण तरीही तोच आपला तारणहार...🫣)
तरीही त्याच्या जोरावर मनाशी म्हटलं — “चलो, करते हैं!”
तर सांगायचा मुद्दा....की यामुळे, या वेळेस प्रवास फक्त ठिकाणांचा नाही, तर स्वतःलाही नव्याने भेटण्याचा असणार आहे… आणि मग तर जाऊन बघायचच असं ठरले !
...सुट्टी मिळेल का?..... खर्च कितपत होईल?..... कोणी बरोबर नसल्यामुळे एकटीने हा प्रवास झेपेल का?....कुठली अडचण नाही ना येणार?... परिषदेला बाकीचे कसे असतिल?...असे असंख्य प्रश्न मनात गर्दी करून उभे होते.
घरच्यांनी परत परत  विचारलं, “एकटी जाशील ना नक्की?” …मी बाहेरून शांतपणे आत्मविश्वासाने “हो” म्हटलं; आणि आतून माझं मन म्हणालं — “बाई गं, खरंच??” 😂सगळेच आपले आपण करत होते....तिथे फोन चालू रहावा म्हणून तेवढ्या पुरते एक कार्ड घेतले [ फोन शिवाय कुठलेच जेनरेशन राहू शकत नाही आजकाल....GenZ चेच नाही की Gen X चेही नाही!😜] नंतर व्हिसा काढण्यासाठी सुद्धा सगळी कागदपत्रे एकत्र केली...तिथल्या ठिकाणी सुध्दा एकटीच गेले....पण त्यासाठी सगळ मार्गदर्शन गिरीकंद मधून घेतले... त्यांनी तिकिटे व्हिसा हॉटेल बुकिंग साठी सगळे केले आणि वर प्रोत्साहन ही ही दिले....'जा मॅडम मस्त फिरून या अहो सगळ्यांना नाही मिळत अशी संधी....!' (आत्ता संधी साधू व्हायचंच असे ठरवून टाकले !)
संदीप खरे म्हणतो तसे —
आभाळभर पसरलेले प्रश्न… आणि ढगभर सुद्धा उत्तरे नव्हती…...पण तरीही, त्या प्रश्नांनाही निरुत्तर करेल असं काहीतरी मनात खोलवर दाटून आलं होतं. एक आतला आवाज सतत ढकलत म्हणत होता — “एकदा ठरवलं ना? मग कर!”
जसा जसा जाण्याचा दिवस जवळ येऊ लागला, तसं तसं मनातलं टेन्शनही वाढू लागलं… “एवढा पैसा, एवढा वेळ खर्च करून हाती काहीच लागलं नाही तर? आपल्याकडून आपल्या धांदरट स्वभावामुळे काही अडचण आली तर?” हा प्रश्न सारखा मनाच्या दारावर टकटक करत होता.
“काही अवघड नाही” असं म्हणताना पासपोर्ट कुठे ठेवला....त्यावरचा व्हिसा...फॉरेक्स कार्ड त्याचा पासवर्ड हे सगळे मात्र दिवसातून तीनदा तपासत होते. 😛
विमानप्रवासाच्या तयारीपेक्षा “चार्जर घेतलाय ना?” हीच जास्त मोठी चिंता होती. 😅त्यात माझ्या कोर्से चे अंतर्गत मूल्यमापन त्याच दरम्यान होते....मनात म्हटले 'हे हि आत्ताच यायचे होते..??!!  एक ना धड भाराभर चिंध्या व्ह्ययला नको म्हणजे झालं...!!'
माणसाचं मनही किती विचित्र असतं ना.....जेव्हा आपल्या मनासारख्या गोष्टी होत नाहीत, तेव्हा त्याबद्दल तक्रार करत राहतं…..आणि जेव्हा आयुष्य भरभरून काही तुमच्या मनासारखे दान देऊ लागतं, तेव्हा — “हे सगळं मला का मिळतंय?”....“मिळालेलं नीट जपता येईल ना?”.....“त्याचं संवर्धन करता येईल ना?”.... अशा काळज्यांत अडकून बसतं. 
ह्या सगळ्यात एक गोष्ट मात्र समाधान देणारी होती — आणि ती म्हणजे मी माझ्या परीने इथली सगळी व्यवस्था नीट लावलेली होती. असीम त्याच्या मामा-मामी आणि आजीकडे राहणार होता. त्यामुळे त्याची काळजी नव्हती…आणि कदाचित म्हणूनच, पहिल्यांदाच स्वतःसाठी इतक्या दूर जाण्याचं धाडस मन हळूहळू स्वीकारत होतं.
तर मग मनातले हे सगळे किंतु-परंतु थोडावेळ बाजूला सारले…आणि तयारी सुरू झाली... कागदपत्रं, तिकिटं, बॅगा, नियोजन…कपडे चार्जेर ....
इतका आत्मविश्वास होता की जग फिरून येईन असं वाटत होतं…..आणि त्याच वेळी airport वर security check मध्ये पाण्याची बाटली काढायची विसरणार हेही ठाऊक होतं. 🤦‍♀️
या सगळ्याच्या गडबडीत माझ्याही नकळत माझी एक वेगळीच तयारी सुरू होती — स्वतःवर विश्वास ठेवण्याची.....स्वतःहून स्वतःची साथ देण्याची...!!

विमानाच्या प्रतिक्षेत अस्मादिक 🙏
चेहऱ्यावर आत्मविश्वास… आणि मनात “passport आहे ना?” ची १७ वी खात्री! 😛



मनातील धाकधूक सावरताना .....अस्मादिक 😛
बाहेरून calm and composed… आतून full-on buffering चालू! 😂









Comments

  1. Sharvari TathavadekarMay 18, 2026 at 10:44 AM

    किती भारी...मस्त लिहिलं आहेस, प्रवासाला निघाल्या सारखं वाटतंय मलाच..! पुढचा भाग??

    ReplyDelete
    Replies
    1. 🙏 पुढचे भाग ही लवकरच ...काम चालू आहे!!

      Delete
  2. खूपच छान लिहिलं आहेs .जस जसेच्या तसे समोर आलं.पुढच्या भागाची उत्सुकता निर्माण झाली आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद 🙏

      Delete
  3. वा , इतक्या छान मराठीत प्रवासवर्णन,फिनलंड वर आपलंच राज्य आहे असं वाटत आहे !

    ReplyDelete
  4. आहेच मराठीच राज्य तिथे...झेंडा फडकवला आहे मराठीने तिथेही!!

    ReplyDelete
  5. एकदम भारी अवंतिका
    तुझी अशीच प्रगती होवो
    पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत आहे

    ReplyDelete
    Replies
    1. आता आज मी अवंतिका आहे का? 🤦🏻‍♀️पुढचा भाग पब्लिश केला आहे. जरूर वाचा 🙏

      Delete
  6. क्या बात है, मस्त लिहिले आहेस, असे छान छान लिहिण्यासाठी फिरत रहा... तुझ्या लेखामुळे मुळे आम्ही Finland बघू... फिरत रहा, लिहित रहा

    ReplyDelete
    Replies
    1. प्रगती जोशीJune 15, 2026 at 6:12 AM

      थँक्स रूपा!! असे सगळ्यांचेच आशीर्वाद असतिल तर मिळेल फिरायला 🙏🙏

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

प्र चा एकल प्रवास.... एकला चलो रे ....

प्र चा एकल प्रवास....पॅलेस,नोबेल प्राईझ म्युझियम, निळाई आणि मी!!