प्र चा प्रवास .......कला,कॉफी आणि प्रतीक्षा नवीन अध्यायाची !!
प्र चा प्रवास .......कला,कॉफी आणि प्रतीक्षा नवीन अध्यायाची !!
हेलसिंकीमधल्या पहिल्याच रात्री स्वतः च्या घरी लागावी तशी गाढ झोप लागली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी एकदम टापटीप आवरून अस्मादिक नाश्त्याला वेळेवर हजर झाले.
युरोपमध्ये सगळीकडे कॉल्ड ब्रेकफास्ट असतो हा अनुभव काही नवीन नव्हता. पण AX हॉटेलमध्ये नाश्त्याचा थाट बघून माझ्या मनातला खादाड भारतीय [ खर म्हणजे पक्का चवीने खाणारा पुणेकर] जागा झाला.
पॅनकेक, त्याबरोबर तीन-चार प्रकारचे जॅम, सॅलड, त्यात घालण्यासाठी कच्च्या भाज्यांची फौज, अगदी छोट्या, बारीक तुकड्यांत कापलेलं पनीर, पाच-सहा प्रकारची ड्रेसिंग्ज, चार प्रकारचं चीज, क्रॉसाँ, वेगवेगळे ब्रेड आणि आपले आपण टोस्ट करून घेण्याची सुविधा!
आपल्याकडे कसे "घे गं, अजून एखादे घे" म्हणत असतात; कोणीतरी मनापासून वाढत ह्या भावनेनेच चार घास जास्तं जाताना...आणि इथे मशीनच "ब्रेड माझ्या आत टाका आणि स्वतःच पाहिजे तसा आणि पाहिजे तेवढा स्वतःच भाजून घ्या" असं सांगत होतं. स्वावलंबनाचा पहिला धडा नाश्त्यापासूनच!
सगळ्यात सुखद धक्का म्हणजे इथे दररोज मटारचे बॉल [तळून ठेवलेले असायचे] आणि छोले! शिवाय चार प्रकारचे केक, पेस्ट्री, चहा, कॉफी, ग्रीन टी, हॉट चॉकलेट, दोन वेगवेगळ्या फळांचे ज्यूस...
स्वीडनमधल्या हॉटेलमध्ये इतके पर्याय नव्हते, त्यामुळे माझ्या मनातला मध्यमवर्गीय ग्राहक लगेच खूश झाला — "पैसे वसूल!"
![]() |
| हॉटेल एक्स मधील भरपेट आणि भरपूर ऑपशन्स असलेला नाश्ता ! |
कसे असते, परदेशात गेल्यावर आपल्या देशाची तिथल्या खाण्याची,आठवण जरा जास्तच येते. त्यामुळे कांदापोहे, मिसळ, बटाटावडा, डोसा यांच्या आठवणींना उजाळा देत मी तो यूरोपियन नाश्ता मनापासून एन्जॉय करत होते. मनात म्हटलं, "तुका म्हणे त्यातल्या त्यात, हेही नसे थोडके!"
आमच्या हॉटेलमध्ये लॉरा नावाची रिसेप्शनिस्ट होती. मी तिला आल्यापासून असंख्य प्रश्न विचारले. इतके प्रश्न विचारले की तिच्या जागी एखादी भारतीय शिक्षिका असती तर तिने मला वही काढायला सांगून 'प्रश्नमंजुषा'च लिहून काढायला सांगितली असती! पण लॉराने प्रत्येक प्रश्नाचं हसतमुखाने काम करता करता,उत्तर दिलं.
तिच्या सल्ल्यानुसार नाश्त्यानंतर HSL App वरून २४ तासांचं तिकीट काढलं आणि ट्राम स्टेशनवर जाऊन उभी राहिले.
मी जिथे थांबले होते त्या स्टेशनचे नाव होते- वॅलिमेरेनकाटू (हे त्या स्टेशनचं नाव! आणि याचा अर्थ म्हणे "भूमध्यसागरीय रस्ता" असा होतो इति लॉरा उवाच!.) हा हेलसिंकीमधल्या जात्कासारी या भागातील एक मुख्य रस्ता आहे. ह्याला मुख्य म्हणायचे कारण इथून गाड्या, ट्राम आणि दळणवळणाची रहदारी [ ही फिनिश लोकांना वाटते....मला तर तो रस्ता एकदम शांत वाटला] होती. एकेकाळी हा भाग मालवाहू जहाजांच्या बंदरासाठी ओळखला जायचा, पण आता त्याचं रूप पूर्णपणे बदललं आहे. समुद्रकिनाऱ्यालगत वसलेला हा आधुनिक परिसर प्रशस्त रस्ते, सुंदर, सुबक इमारती आणि निवांत फिरण्यासाठी असलेल्या जागांमुळे खूप आकर्षक वाटत होता.
![]() |
| ट्राम, रस्ते आणि रेल्वे ला जोडणारे सेंट्रल स्टेशन |
) हा हेलसिंकीमधला नव्याने विकसित झालेला परिसर आहे. स्कॅन्डिनेव्हियन शैलीतील इमारती, नीटनेटकी नगररचना आणि पर्यावरणपूरक नियोजन, फुलांची रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी असलेली आरास यामुळे हा भाग विशेष लक्ष वेधून घेतो. इथल्या रस्त्यांना जगभरातील समुद्र, जलाशय आणि भौगोलिक प्रदेशांची नावे देण्याची एक वेगळीच पद्धत आहे. [ ही माहिती मला पहिल्या दिवशी भेटलेल्या माझ्या वाटाड्या ने दिली होती.] एस्टोनियाची राजधानी, वास्तु स्थापत्यच्या नमुना असलेल्या टॅलिन येथे जाणाऱ्या फेरीबोटीही याच भागातून सुटतात. .ट्राममधून प्रवास करताना एक गोष्ट लगेच लक्षात आली. प्रत्येक स्टेशनचं नाव डिजिटल बोर्डवर पुढे दिसत असे आणि ते फिनिश तसेच स्वीडिश या दोन्ही भाषांमध्ये लिहिलेलं असे. फिनिश ही इथली मुख्य भाषा असली, तरी स्वीडिशही मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी दोन्ही
भाषांचा वापर दिसून येतो. 

ट्राम मधून कांपी स्टेशनला उतरून मी लॉराने दिलेल्या सल्ल्यानुसार, तिथे शॉपिंग करण्यासाठी फिरू लागले. मनात ठरवूनच आले होते की जरा रस्त्यावरची खरेदी [street shopping] करू, थोडा भाव करू, दुकानदाराशी घासाघीस करू आणि मग वस्तू विकत घेऊ. पण इथे शिरल्यावर लक्षात आलं की हा काही बाजार नाही, तर भलामोठा चकाचक मॉल आहे!
माझ्या भाव करण्याच्या सर्व योजना तिथल्या तिथे कोसळल्या. कारण तिथे भाव करायला कोणीही नव्हते आणि एखादा असता तरी त्याने माझ्याकडे बघून "मॅडम, हे फिनलंड आहे, लक्ष्मी रोड नाही!" असंच म्हटलं असतं.
तो मॉल म्हणजे अगदी आधुनिक वास्तूमधली तुळशीबागच वाटत होती. फरक एवढाच की इथे कुणी "या ताई, बघून तरी जा!" असं ओरडत नव्हतं की कोणी "एवढे कसे कमी होईल वहिनी..? मला रुपया तरी कमवू द्या....!" असे आर्जवी स्वरात बोलत नव्हते....बघा, पाहिजे तर घ्या, पैसे भरा आणि झाल..!!
कांपीच्या त्या मॉल मध्ये इंडोनेशिया, बांगलादेश इथे बनलेले कपड़े विकायला होते. बर्याच गोष्टी आशियाई मार्केट मधल्या होत्या. त्या इथे पुण्यातही मिळतात हे लक्षात आल्यावर मग "परदेशात आल्यावर काहीतरी वेगळं असेल तरच बघूया" या उदात्त विचाराने मी तिथून काढता पाय घेतला.आणि मॉल च्या दुसर्या दरवाज्यातून बाहेर पडले तर ते एक मोठे स्क्वेअर होत. तिथे सुरेल संगीताचा आवाज येत होता. अर्थातच त्या दिशेने गेल्यावर लक्षात आले की तिथे जणू रविवारचा बाजार किंवा तंबू मार्केट सारखाच प्रकार होता...छोटे छोटे स्टॉल होते, हस्तकलेच्या विविध वस्तू विकायला ठेवलेल्या होत्या...काही खाण्याच्या पदार्थांचे स्टॉल होते आणि स्टेज वर थाई सांस्कृतिक कार्यक्रम चालू होता...त्यांच्या संस्कृती नुसार वेशभूषा करून काही जण स्टेज वर नाचत होते आणि बाकीचे त्यांची पारंपरिक वाद्य वाजवत आणि माइक वर सुरेल गात त्यांना साथ करत होते.....
![]() |
| थाई सांस्कृतिक कार्यक्रम....त्यानुसार पेहराव करून गाणाऱ्या मुली! |
घर सोडल्यापासून पहिल्यांदाच असे भरपूर लोक एका ठिकाणी कामाशिवाय, जमलेले पाहत होते....थोड्या वेळ मंडईत आल्यासारखे वाटले. त्यांची गाणी समजत नव्हती, पण आपल्या लग्नातल्या मावश्या नाच येत नसतानाही कश्या आत्मविश्वासाने डान्स करतात, तितक्याच आत्मविश्वासाने मीही मान डोलावत कार्यक्रमाचा आनंद घेत होते.
तिथून मला खर तर नॅशनल म्युजियम बघायला जायचे होते. पण कसले काय.....ते म्युजियम आत्ता डागडुजीसाठी बंद होते जानेवारी २०२७ ला चालू होणार होत.मग म्हटलं, आता म्युझियम आतून बघता येत नसेल तर त्याच्या आसपासचं तरी बघू. शेवटी प्रवासात प्लॅन A फसला की प्लॅन B जन्माला येतो, आणि प्लॅन B फसला की "चल, दिसतंय ते बघू" हा सर्वात यशस्वी प्लॅन ठरतो!
मग त्याच्या आजूबाजूची ठिकाणे बघायचे ठरवून तिथून चालू पडले...हातात भरपूर वेळ होता [अनंत म्हणायला हवा तसा]... मग जवळच्या HAM म्हणजेच Helsinki Art Museum मध्ये जावे असे ठरवले.... तर तेही बंदच होते... अरे हे काय चाललय काय?! ही सगळी म्युजियम एका चांगल्या रसिकाला [ अर्थातच माझ्यासारख्या
] मुकली.... मग तिथून जवळच समकालीन कला संग्रहालय 'कियास्मा' (Kiasma) होते. हे फिनलंडमधील आधुनिक कलेचे एक आगळेवेगळे दालन आहे. १९९८ मध्ये सुरू झालेल्या या संग्रहालयात रॅम्प आणि पायऱ्यांनी जोडलेले पाच मजले आहेत. मुख्य म्हणजे तुम्ही एका मजल्यावरून इतके सहज दुसर्या मजल्यावर जाता की ते जाणवत ही नाही.
मग त्याच्या आजूबाजूची ठिकाणे बघायचे ठरवून तिथून चालू पडले...हातात भरपूर वेळ होता [अनंत म्हणायला हवा तसा]... मग जवळच्या HAM म्हणजेच Helsinki Art Museum मध्ये जावे असे ठरवले.... तर तेही बंदच होते... अरे हे काय चाललय काय?! ही सगळी म्युजियम एका चांगल्या रसिकाला [ अर्थातच माझ्यासारख्या
] मुकली.... मग तिथून जवळच समकालीन कला संग्रहालय 'कियास्मा' (Kiasma) होते. हे फिनलंडमधील आधुनिक कलेचे एक आगळेवेगळे दालन आहे. १९९८ मध्ये सुरू झालेल्या या संग्रहालयात रॅम्प आणि पायऱ्यांनी जोडलेले पाच मजले आहेत. मुख्य म्हणजे तुम्ही एका मजल्यावरून इतके सहज दुसर्या मजल्यावर जाता की ते जाणवत ही नाही. येथे मुख्यतः फिनलंड आणि आसपासच्या प्रदेशांतील समकालीन कलाकृतींचा संग्रह मला पाहायला मिळाला. संग्रहालय मोठे, प्रशस्त आणि थोडेसे भूलभुलैय्यासारखे आहे. दोन-तीन वेळा नकाशा पाहूनही मी कुठे आहे हेच समजेना! पण त्या गोंधळातही प्रत्येक वळणावर एखादा नवीन कलानुभव दडलेला होता. तिथे सामानासाठी लॉकरची सुविधा होती
येथील प्रदर्शने सतत बदलत असल्याने प्रत्येक भेटीत काहीतरी नवीन पाहायला मिळते असे म्हणतात!!
सर्व भिंती पांढर्या रंगांमधे असल्यामुळे सर्वसमावेशी वाटत होते अनुसार मुख्य म्हणजे प्रकाशाचा यथायोग्य वापर होत होता. कुठे सांस्कृतिक डॉक्युमेंटरी दाखवत होते तर कुठे पारितोषिक विजेत्या कलात्मक छोट्या फिल्म होत्या..कुठे आधुनिक चित्रकलेची सुरेख चित्र होती तर कुठे अप्रतिम बोलकी छायाचित्र...,प्रत्येक कलाप्रकार काही सांगू पाहणारा होता दैनंदिन वापरातील वस्तू, व्हिडिओ, चित्रे किंवा शिल्पे यांचेसुद्धा कलेत रूपांतर होऊ शकते.ह्या,संग्रहालयाने माझी कलेकडे पाहण्याची दृष्टी बदलून टाकली.
काही लोक प्रत्येक गोष्टीत कला शोधतात आणि त्यातच कलेचे सौंदर्य दडलेले असते. पाहण्याच्या, ऐकण्याच्या आणि विचार करण्याच्या संवेदनांना सतत चालना देणारा हा अनुभव खरोखरच वेगळा होता.
शनिवारी दुपारी अनेक हेलसिंकीकर आपल्या कुटुंबासह किआस्मामध्ये येतात. मुलांना काहीतरी वेगळे, सर्जनशील आणि विचार करायला लावणारे दाखवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. मला वाटत सर्जनशीलता मुलांमध्ये रुजविण्यासाठी पालक मुलांना इथे घेऊन येत असावेत. मी गेले होते तेव्हाही अनेक कुटुंबे आपापल्या मुलांना तिथे घेऊन आली होती, त्यांना कला समजून सांगत होती. [मुलांना आणि विद्यार्थ्यांंना प्रवेश फ्री आहे ]
हेलसिंकीतील किआस्मा हा माझ्यासाठी एक उत्कृष्ट अनुभव आहे. अर्थात, इथली सर्व कला समजलीच अस काही नाही! पण इथल्या काही कलाकृती विचार करायला लावतात, काही थक्क करतात. [तर काही पाहून "हे खरंच कला आहे की साफसफाईवाल्याने चुकून काहीतरी इथे ठेवून दिलंय?" असा प्रश्न पडतो.] मनाला शांत वाटणारे आणि कलेला पूरक संगीत योजना, प्रकाश आणि अंधार ह्याचा समर्पक वापरातून अवकाश तयार केले आहे काही दालनामध्ये ....ते अगदी बघण्यासारखे खरं म्हणजे अनुभवण्यासारखे आहे.!!
कापड, तार, लाकूड, धातू, व्हिडिओ, प्लास्टिक, दोर, कापड अशा असंख्य माध्यमांतून साकारलेल्या कलाकृती कल्पनाशक्ती, विनोद, अस्वस्थता आणि चिंतन यांचा अनोखा मिलाफ घडवतात. किआस्मा तुम्हाला थांबून विचार करायला, अनुभव घ्यायला भाग पाडते.
२२ युरो (खूपच वाटली होती मला ही प्रवेश फी) प्रवेश शुल्क मोजल्यानंतरही बाहेर पडताना वाटतं—कलेचा अर्थ कळला की नाही माहीत नाही, पण अनुभव मात्र एकमद्वितीय नक्कीच मिळाला!
11 वाजता तिथे आत शिरले होते आणि मी 3 वाजेपर्यंत बघतच होते....काळाचे, वेळेचे [आणि भुकेचे] भान विसरायला लावणारा अनुभव असला तरी तिथल्या कॅफे मधली वाफाळती कॉफी आणि त्याबरोबर फ्राईज हे खाल्ल्यावर अजून ताजेतवाने वाटले.
![]() |
| वाफाळती कॉफी आणि त्याबरोबर फ्राईज ..... परदेशातील शाकाहारी लोकांचे गो टू फूड! |
तिथेच बसून 2/3 फोन केले आणि आलेल्या अनुभवाचे कथन केले.....तोवर माझ्या पुढचे पाच दिवस सोबत असणाऱ्या रूम पार्टनरचा — सौ. रती देशपांडे हिचा फोन आला. ती तिथल्या रेल्वे स्टेशनवर पोहोचली होती. इतके दिवस एकल प्रवास होता, आज अजून एक पार्टनर मिळणार ह्या भावनेने लगेच तिला भेटायला निघाले.
आमची ही पहिलीच प्रत्यक्ष भेट होती. फोनवर एक-दोनदा बोलणं झालं होतं, त्यामुळे फक्त नाव आणि आवाज ओळखीचा होता.
ती भेटली आणि गप्पा मारता मारता कळलं की तिने जवळच एक Airbnb बुक केलं होतं. मग फोनवर दिशा विचारत, नकाशा बघत आणि मध्येच "अगं आपण बरोबर चाललोय ना?" अशी खात्री करत आम्ही तिच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. जागा छान, स्वच्छ आणि ऐसपैस होती.
रतीचा उत्साह मात्र त्या जागेपेक्षाही मोठा होता! एवढा लांबचा प्रवास करून आल्यावर एखाद्याला आधी थोड आडव व्हाव, चहा घ्यावा, दम खावा असं वाटतं. पण नाही! तिने झटपट फ्रेश होऊन घरी फोन केला, कपडे बदलले आणि, "चल, आता फिरायला जाऊया!"असं जाहीरही केलं.
मी मनात म्हटलं, "ही बाई बॅटरीवर चालते की सौरऊर्जेवर?" तरीही फार लांब न जाता आसपासच फेरफटका मारायचं ठरवलं आणि आम्ही बाहेर पडलो.
![]() |
| रती ला स्टेशन वर घ्यायला गेले.... आणि आपल्याकडचे कोणी भेटल्यामुळे खूप बरे वाटले..!! |
![]() |
| फिनलंडचे राष्ट्रीय लेखक अलेक्सिस किवी यांचा पुतळा ! |
थोड्याच वेळात वातावरणात गारवा वाढू लागला. संध्याकाळच्या आकाशाने रंग बदलायला सुरुवात केली होती. निळसर, करड्या आणि गुलाबी छटा एकमेकांत मिसळून एक सुंदर चित्र तयार होत होतं.
त्या आकाशाकडे पाहताना अचानक मन अनेक वर्षं मागे गेलं.
कॉलेजचे दिवस आठवले.
एस. पी. कॉलेजमधून डेक्कनकडे चालत जाताना लकडी पुलावर थांबणं, नदीकाठचं आभाळ न्याहाळत बसणं, मित्रमैत्रिणींबरोबर जग बदलण्याच्या गप्पा मारणं... त्या काळात वेळ खूप असायचा आणि चिंता खूप कमी.!! हेलसिंकीच्या त्या चौकात बसून तेच आभाळ पाहताना जाणवलं — शहर, देश, भाषा जरी बदललेली असली; तरी संध्याकाळचं आभाळ आणि त्याच्याशी जोडलेल्या प्रत्येकाच्या,आठवणी कधीच बदलत नाहीत.
मग आम्ही दोघीही तिथेच थोडावेळ बसलो. नुकतीच ओळख झालेली असली तरी गप्पा मात्र जुन्या मैत्रिणींप्रमाणे रंगल्या. प्रवासाच्या, घरच्या , कामाच्या, मुलांच्या आणि अर्थातच भारतीय बायकांच्या आवडत्या विषयाची — खाण्यापिण्याच्या! ..........तोपर्यंत भूकही लागू लागली होती.
मग त्या सुंदर संध्याकाळी, गार वाऱ्याला आणि जुन्या आठवणींना सोबत घेत आम्ही जवळच्या एका कॉफी हाऊसकडे मोर्चा वळवला... परदेशात आपल्याला पाहिजे तशी कॉफी ऑर्डर करता येणे ही एक कला आहे हे त्या दिवशी शिकायला मिळाले...
मला पाहिजे तशी कॉफी ऑर्डर करून मी टेबलवर जाऊन बसले...आणि मग रतीने तिची कॉफी ऑर्डर केली.
परदेशात एक गोष्ट हमखास जाणवते — कॉफी शॉप ही फक्त कॉफी पिण्याची जागा नसते, तर लोकांच्या गप्पा, भेटीगाठी आणि निवांत क्षणांची जागा असते. मोठमोठे मग भरून कॉफी, सोबत कुकीज, क्वॅसाँ, सँडविचेस, गार्लिक ब्रेड... आणि समोर बसलेली माणसं. तासन्तास गप्पा मारत वेळ कसा जातो ते कळतही नाही.
माझ्यासमोरही एक मोठ्ठा मग भरून कॉफी आली होती. वर मस्त क्रीम आणि चॉकलेट चिप्सचा साज..अहाहा!! ... ताज्या भाजलेल्या कॉफी बीन्सचा सुवास भरून घेत, कॉफीचे घुटके घेत, त्या वातावरणाचा आस्वाद घेत बसले होते. तेवढ्यात रती हसत-हसत, पण चेहऱ्यावर वैतागलेले भाव घेऊन आली.
"अगं, हे काय दिलंय ह्या बाईंनी मला? नुसती काळी गरम कॉफी! मी ही कशी पिऊ?"
मला काहीच कळेना....मी तिच्या कपात डोकावून पाहिलं आणि हसू आवरेना.
ऑर्डर देताना तिने स्पष्ट सांगितलं होतं — "गरम दुधाची कॉफी, साखर असलेली." पण तिथल्या पद्धतीनुसार तिला ब्लॅक कॉफी दिली होती आणि बाजूला गरम दूध व साखर ठेवून सांगितलं होतं, "तुम्हाला जितकी हवी तितकी घाला आणि घ्या."
आणि गंमत म्हणजे ते "गरम" दूध आपल्या भारतीय निकषांनुसार अगदीच कोमट होतं! आता नेहमी गरम वाफाळती कॉफी पिणाऱ्या रतीला ते कसं आवडणार? मी तिला माझ्यातली थोडी कॉफी [अर्थातच जड अंतःकरणाने
] दिली.
] दिली. ती कॉफीकडे बघत होती आणि कॉफी तिच्याकडे!
थोडे प्रयत्न करून तिने काही घोट घेतले, पण शेवटी हार मानली. उरलेली कॉफी कपातच राहिली.
"फिनलंडमध्ये कॉफी पिण्यापेक्षा कॉफी बनवण्याचंच काम ग्राहकाकडे देतात बहुतेक....आणि ग्राहकाला असे गोंधळून टाकतात ....!" असं म्हणत आम्ही खळखळून हसलो.
पण मग ठरवलं — In Rome, do as the Romans do! इथे आलो आहोत तर इथल्या पद्धतीही अनुभवायच्या. त्यामुळे कॉफीचा विषय बाजूला ठेवून पुन्हा गप्पांचा फड रंगला.
त्यानंतर उगाचच आसपास फेरफटका मारला आणि जवळच्या सुपरमार्केटमध्येही गेलो. रतीला रात्रीसाठी काही खाणं घ्यायचं होतं. एवढ्या दूर, जगाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या देशातल्या सुपरमार्केटमध्ये फिरताना सतत वाटत होतं — "अरे, हे तर आपल्या इथल्यासारखंच आहे!"
कंपन्यांची नावं वेगळी होती, पॅकेजिंग वेगळं होतं, भाषा वेगळी होती; पण वस्तू मात्र जवळपास त्याच. ब्रेड, दूध, दही, फळं, भाज्या, बिस्किटं, स्नॅक्स, टूथपेस्ट, साबण... माणसाच्या रोजच्या गरजा जगभर सारख्याच असतात.
बाहेर अजूनही लख्ख सूर्यप्रकाश होता, त्यामुळे वेळेचा अंदाजच येत नव्हता. पण घड्याळाकडे पाहिल्यावर लक्षात आलं की रात्रीचे साडेआठ-नऊ वाजत आले होते. मग तिला तिच्या रूमवर सोडून मी परत ट्रामने माझ्या हॉटेलकडे निघाले. हॉटेलमध्ये पोहोचेपर्यंत जवळपास पावणेदहा वाजले होते.
रिसेप्शनवर लॉरा नेहमीप्रमाणे हसतमुखाने उभी होती. किआस्मामधला दिवस कसा गेला ते तिला उत्साहाने सांगितलं आणि मग मी रूमकडे निघणार इतक्यात तिने विचारलं,
"Do you have any more questions?"
क्षणभर मला काहीच कळेना. मनात लगेच विचार आला – बापरे! मी इतके दिवस हिला प्रश्न विचारून, गप्पा मारून, माहिती काढून इतका त्रास दिला की आता ती माझा प्रश्नांचा कोटा संपवून घेत आहे की काय! माझ्या चेहऱ्यावरचे भाव पाहून ती हसली आणि म्हणाली,
"तसं काही नाही. मी उद्या सकाळी असेन, पण उद्या संध्याकाळनंतर दोन दिवस सुट्टीवर आहे. त्यामुळे तुला अजून काही माहिती हवी असेल तर आत्ताच विचार. आणि मी नसताना तुला काही अडचण आली तर इथल्या सगळ्यांना सांगून ठेवते की तुझी नीट मदत करायची. So don't worry!"
तिचं हे बोलणं ऐकून मला खरंच छान वाटलं. ती तिचं काम करत होती, पण त्या शब्दांमध्ये केवळ कर्तव्य नव्हतं; त्यात आपुलकी होती. हजारो किलोमीटर दूर, एका अनोळखी देशात, अनोळखी शहरात, एखाद्या माणसाने आपली काळजी घ्यावी, एवढंच पुरेसं असतं मनाला दिलासा देण्यासाठी ऊर्जा देण्यासाठी.
आपल्या भारतात जसं एखादी व्यक्ती "काळजी करू नका, काही लागलं तर सांगा" असं मनापासून म्हणते, तसंच काहीसं लॉराचं होतं. त्या क्षणी माझ्यासाठी ती फक्त हॉटेलची रिसेप्शनिस्ट राहिली नव्हती; ती त्या परक्या शहरातली एक ओळखीची, विश्वासाची व्यक्ती बनली होती.
आणि मला पुन्हा एकदा जाणवलं – प्रवासात आपण ठिकाणांपेक्षा माणसं जास्त आठवणीत ठेवतो. संग्रहालयं, इमारती, रस्ते आधुनिकता बदलेल ही कदाचित....पण अशा छोट्या-छोट्या माणुसकीच्या भेटी मनात कायमच्या घर करून राहतात... घरच्यांशी बोलून, थोडावेळ टीव्ही पाहून मी निवांतपणे अंग टाकलं. दिवसभराच्या प्रवासाचा थकवा आता हळूहळू उतरू लागला होता. उद्या रतीसोबत फिनलंड अनुभवायचं होतं. माझा आतापर्यंतचा एकल प्रवास संपत आला होता आणि उद्यापासून आणखी काही नवीन मैत्रिणी फिनलंडमध्ये येऊन दाखल होणार होत्या.
दोन दिवसांनंतर आमची पहिली मराठी सृजनशील शिक्षण परिषद सुरू होणार होती. त्या परिषदेत सहभागी होण्याच्या निमित्तानेच हा सारा प्रदीर्घ प्रवास घडून आला होता. या प्रवासाने मला केवळ नवीन देश, नवीन संस्कृती आणि नवीन माणसं दाखवली नव्हती, तर स्वतःकडेही एका वेगळ्या नजरेने पाहायला शिकवलं होतं. माझ्यातल्या धाडसाची, जिज्ञासेची आणि स्वावलंबनाची नव्याने ओळख झाली होती.
त्यामुळेच त्या परिषदेबद्दल मनात एक वेगळीच उत्सुकता होती. आतापर्यंतच्या अनुभवांची शिदोरी घेऊन आता नव्या शिकण्याच्या पर्वाची सुरुवात होणार होती. मनात अनेक प्रश्न, अनेक अपेक्षा आणि असंख्य स्वप्नं दाटून आली होती. म्हणूनच मी आतुरतेने वाट पाहत होते १० मेच्या उगवत्या पहाटेची... कारण त्या दिवसासोबत सुरू होणार होता माझ्या फिनलंड प्रवासाचा आणखी एक सुंदर आणि अर्थपूर्ण अध्याय!
![]() |
| नवीन अध्यायाच्या प्रतीक्षेत ...अस्मादिक ! |




.jpg)
.jpg)
.jpg)


.jpg)

ते एक मोठे स्क्वेअर - ए इथे तू आम्हाला नेलंच नाहीस. आणि किअस्मा इथे पण नाही 🤔🤔
ReplyDeleteअग स्टेशन च्या मागे जे स्क्वेअर होते ना तिथेच तो जलसा होता...तो फक्त शनिवारी होता...आपण तिथून गेलो. आणि किआस्मा थोडे लांब होते, महाग होते आणि आर्ट म्युझियम ला जाऊ या का म्हटल्यावर तारिणी आणि इतरही नको म्हणाले म्हणून नेले नाही. मला आवडले होते ते!!
Deleteफारच छान वर्णन ,खर तर इतक्या रसिकतेने प्रवास करणारे आणि अनुभव सांगू शकणारे तुझ्या सारखे
ReplyDeleteलोक दुर्मिळच!
मनःपूर्वक धन्यवाद!! आपण सगळेच असे आहोत.....रसिकतेने बघणारे....फक्त मी अनुभव लिहून काढते आहे!! त्यानिमित्ताने उजाळा आपण काय काय पाहिले, अनुभवले आणि त्यातले काय भावले, आपण आपल्यात रुजवू शकतो त्याचा !!
Deleteमस्तच गं..आता पुढच्या वर्षीची ट्रीप पण प्लॅन कर.
ReplyDeleteअरे बापरे!! आत्ताच??!! वर्षभरा आधीच?!🤦🏻♀️
Deleteखूप छान, next time मला पण घेऊन जा 😀
Deleteमी लाख घेऊन जाईन....तुही आली पाहिजेस!! पुढचा प्रवास ठरवताना नक्की विचारेन तुला 👍🏻
Deleteनेहमीच आवडतं असं प्रवास वर्णन केलं जातं तुझ्या कडून मस्तच!
ReplyDeleteमनापासून धन्यवाद मावशी!! तुम्हाला आवडतय त्यामुळे हुरूप येतो लिहायचा!
Delete