प्र चा एकल प्रवास....स्वीडनहून फिनलँडला...... ट्युलिप ... ऑडी ...आणि शिक्षकत्व !!

 स्वीडनहून फिनलँडला...... ट्युलिप ... ऑडी ...आणि शिक्षकत्व !!

आदल्या दिवशी संध्याकाळी वासा म्युझियममधून लवकर परत आले. मग हॉटेल वर जाऊन नुसतच बसण्यापेक्षा बाहेर फिरून यायचा विचार केला.....म्हटलं आलोच आहोत तर जेवढे बघता येईल तेवढे बघू यात ....अनुभवूया.....हॉटेलसमोरचा रस्ता क्रॉस केल्यावर एक सुंदर पार्क होत. तिथे आधी उगाचच जाऊन आले होते...पण त्याच्या शेजारीच दिसणाऱ्या अगदी ठेंगण्या टेकडी बद्दल “इथून संपूर्ण स्टॉकहोमची vibe कळते …” असं हॉटेल मध्ये कुणीतरी सांगितलं होतं…आणि आपणच कसे काय हिच्याकडे दुर्लक्ष केले?? असा विचार करत....पावलं त्या दिशेने वळली.
गारेगार वार्‍याला कापत, झाडांच्या पानांची सळसळ ऐकत, पायर्‍या चढत चढत अवघ्या पंधरा मिनिटांत मी टेकडीवर पोहोचले… आणि समोरचं दृश्य पाहून अक्षरशः हरखून गेले.
 विहंगम हा शब्द पुस्तकात वाचून कळला नव्हता तितका त्या क्षणी ते दृश्य बघताना कळला [ शेवटी अनुभव आधारित शिक्षण च मला चांगलेच कळते ] ....जुन्या इमारतींचे लाल, नारंगी, करडे, फिकट क्रीम, जुनाट पांढरा अश्या रंगांचे कितीतरी शेड… मधेच दिसणारी हिरवीगार झाडी....फुलांनी आच्छादलेली झाडे....लांबून पाहताना अगदी एखाद्या चित्रकाराने नीट सुबकपणे रंग भरलेल्या चित्रासारखे दिसत होते..... एकदम मायक्रोसॉफ्टच्या वॉलपेपर सारखे दिसत होते.....
[ पुण्यातल्या पेठांमधले जुने वाडे पाहिल्यावर जसे वाटते तस वाटल त्या इमारती पाहून ] इथे शिस्त हा गुण आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टीमध्ये दिसला.... त्या इमारती एकदम शिस्तीत रांगेत उभ्या राहिलेल्या मुलांसारख्या दिसत होत्या की आपल्या पुण्यात असत्या तर दोन बिल्डिंगच्या मध्ये एखादा बेशिस्त बॅनर किंवा केबल वायर....काहीच नाही तर- “इथे पार्किंग करू नये” अशी पाटी तरी नक्की दिसली असती! 😄 आधीच थंडगार वातावरण होते.... आणि तिथे टेकडीवर तर चांगलाच गार वारा होता… मस्तपैकी झोंबत होता…इतका की — इथे हवा नाही… प्रत्यक्ष रेफ्रिजरेटर मधूनच वार्‍याचा सप्लाय चालू केला आहे असे वाटत होत 😄केस स्कार्फ.....वार्‍यावर भुरभुरत होते....थंडी अशी अंगभर उतरत होती....! 😄 आजुबाजुला हिरवेगार गवताचे कुरण होतं… छोट्या मुलांना घेऊन आलेली काही जोडपी होती … गप्पा मारत बसलेले काही लोक.... स्वतःचे, छोटेसे- लोभस वाटणारे असे कुत्रे घेऊन फिरायला आलेले आजोबा, तिथे जमलेल्या असंख्य कबुतरांना धान्य खाऊ घालणारी एक आजी [ ती थेट होम अलोन चित्रपटातल्या त्या आजीसारखी दिसत होती जी कबुतरांशी गप्पा मारत त्यांना खाऊ घालत असते ] व्यायाम करणारा एक दोन उत्साही तरुण होते आणि त्या सगळ्या दृश्यात मी..... टेकडी च्या कठड्यावर रेलून....जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत बघण्याचा प्रयत्न करत होते....इतके सगळे अवतीभवती असूनही कुठलाही गोंगाट नाही.....कोणालाही कसली घाई नव्हती.....आवाजही होता तो निसर्गाचाच....पक्ष्यांचा, झाडांचा...प्रसंग एका क्षणात तिथेच थबकला आहे असे वाटत होते. ....असे एखादे दृश्य पाॅज होत...त्या दृश्यात आपण एकदंत एकरूप होऊन जातो.....तसे काहीसे झाले होते! जणू एखादं सुंदर लैडस्केप कुणीतरी रंगवलं होतं… आणि मीही त्या लैडस्केपचाच एक भाग झाले होते…!! 
काही दृश्यं फक्त डोळ्यांनी पाहायची नसतात…..ती डोळ्यांतून....अलगद मनात उतरू द्यायची असतात…..किती वेळ तिथेच तंद्री लागली माहीत नाही....पण ते दृश्य मात्र मनात साठत गेले.... बर्‍याच वेळाने भानावर आले आणि अस्मादिक खाली जायचा रस्ता बघू लागले [ त्या लैडस्केप मध्ये मी इतकी रमले होते की तिथे फोटो काढायचाच विसरून गेले....😛] 
तिथून खाली उतरण्याचा दुसरा रस्ता होता.... नवीन वाट बघावी [ नव्या वाटा जोखण्याची आस हो, दूसरे काय....उगाच चोंबडेपणा नाही हा!] म्हणून तिकडून उतरले आणि खाली आले, माझ्या हॉटेलच्या दिशेने वळले… आणि अचानक एक कमालीचा मोहक सुगंध हवेत दरवळला. आजूबाजूला पाहिलं तर पिवळ्या धम्मक ट्युलिप फुलांचा प्रसन्न ताटवा तिथे बहरलेला होता…
ह्या फुलांचे असे जवळून दर्शन आम्हाला युरोपच्या प्रवासात झाले होते… पण असा संपूर्ण बहरलेला ताटवा पहिल्यांदाच पाहिला.क्षणभर थबकून फक्त बघतच राहिले … 🌷ही फुले पाहिली की आपोआप..देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए ...हे गाणे मनात वाजायला लागले नसते तर नवलच...!!
घरच्यांना विडिओ कॉल मधून ट्युलिपचे दर्शन दिले आणि बळजबरीने गाणे ही ऐकवले[ कारण शास्त्र असते ते]
ट्युलिप्स ......!!


 आणि मग रूम वर परतून, खाऊन, बॅग भरून झोपी गेले.  
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठले कारण मला स्वीडन वरून फिनलैंडला जायचं होतं…एका देशातून दुसर्‍या देशात....!
 पण तरीही जरा निवांतच आवरलं थोडीशी रेंगाळले....आणि सरळ टॅक्सी केली. [ होऊ देत खर्च....] आता आपल्या डोक्यातली टॅक्सी म्हणजे — साधीशी काळी- पिवळ्या रंगाची, खडखड वाजणारी गाडी! पण समोर येऊन थांबली ती एक लांबलचक Audi! 😄 क्षणभर वाटलं —
 “आपण टॅक्सी बुक केली होती की कुणीतरी...[अर्थातच चुकून] ...आपल्याला डिप्लोमॅटिक निरोप द्यायला कोणी आलंय का काय? आता ह्या आवडा बाईंचे(Audi) वेगळे आणि जास्त पैसे नसले म्हणजे मिळवलं ” 😄 [ काय करायचे मध्यमवर्गीय विचार येतोच मनात...] Audi चा चार्ज हॉटेल मध्ये पडताळून घेतला आणि मगच प्रशस्त टॅक्सी मध्ये बसले. 
 त्या दिवशी पुण्यात दहावीचा रिजल्ट असल्यामुळे [ आणि अस्मादिक १० वी च्या वर्ग शिक्षिका असल्यामुळे ] माझा फोन सतत वाजत होता. कुठे विद्यार्थ्यांचे मेसेज … कुठे पालकांचे कॉल्स … कुणी आनंदाने ओरडत होतं, कुणी मार्क्स सांगत होतं… आणि त्या सगळ्या गोंधळात माझ्या आणि ड्राइवरच्याही गप्पा सुरू होत्याच. तासाभराने एयरपोर्टवर पोहोचलो. त्याने माझी बॅग अगदी नम्रपणे बाहेर काढून दिली. मी चार्ज विचारला आणि सहज म्हटलं —“I’ll add tip for you…” तो लगेच हसून म्हणाला —
 “Hey… no need of the tip. Seems you are a teacher…..I heard your conversations...I value education a lot… though I couldn't pursue it...my niece is a teacher...she is very hard working.  And you are a teacher too....you reminded me of her....You are imparting education in India....A very noble profession...So no tips from you… Thanks!”
क्षणभर मी अगदी नि:शब्द झाले…हे संपूर्णपणे अनपेक्षित होतं...
भाषा कळो वा न कळो, गुगल ट्रान्सलेट चालो वा न चालो… "Teacher" हा शब्द मात्र जगभर सहज ट्रान्सलेट होतो— थेट आदरात!
आणि महत्वाचे म्हणजे हा आदर केवळ औपचारिक नव्हता… तो त्याच्या नजरेत, वागण्यात आणि त्याच्या ह्या छोट्या कृतीत जाणवत होता.
....आणि त्या क्षणी का कोणास ठाऊक पण गाणे गुणगुणु लागले —
ये हौसला कैसे झुके… ये आरज़ू कैसे रुके…!!
त्याच भारावलेल्या मनःस्थितीत आत जाऊन चेक इन ची प्रक्रिया पूर्ण केली...मनोमन स्टॉकहोम ला धन्यवाद दिले.... एकल प्रवास करायची उमेद आणि आत्मविश्वास मनात जागृत केला होता ह्या शहराने......स्टॉकहोमवरून एका तासात फिनलैंडच्या Helsinki च्या भूमीवर उतरले..... घड्याळ 1 तास पुढे गेले होते....पण मी आणि माझं मन मात्र अजूनही स्टॉकहोम मध्येच रेंगाळत होते...
पण आत शिरताच इमिग्रेशन ऑफिसरने इतके प्रश्न विचारले, की स्वप्नातून खडबडून जागी होऊन “मॅडम, आता स्वप्नरंजन पुरे… वास्तवात या!” अशी जणू सौम्य आठवण त्याच्या प्रश्नांनी करून दिली. 😄
तिथून बाहेर पडल्यावर मात्र आतापर्यंतच्या प्रवासाने आत्मविश्वास बराच वाढवला होता. एयरपोर्टवरच सगळी चौकशी केली… HSL ऍप एक्टिवेट केलं… मेट्रो आणि ट्रामची तिकीट काढली… आणि अगदी प्रोफेशनल इंटरनेशनल traveller सारखी मेट्रो स्टेशनवर जाऊन उभी राहिले.
[म्हटलं ना… तोवर स्वतःच्या मनात मी केव्हाच “Seasoned Solo Traveller” झाले होते! 😄]
सामान ओढायचीही आता सवय झाली होती. आणि मनात एक वेगळीच excitement होती — आता आजपासून परत नवीन देश… नवीन भाषा… नवीन अनुभव… आणि त्यात परत स्वतःला नव्याने भेटायची संधी…!
मेट्रोमधून बाहेर दिसणारी हिरवीगार दृश्यं बघत सेंट्रल स्टेशनवर पोहोचले. आता पुढचा टप्पा — ट्राम शोधणे!
 पुन्हा चौकशी… पुन्हा दिशांचा अंदाज… आणि शेवटी ट्राम स्टेशन वर जाऊन उभी राहिले.
दुपारचे साडेपाच वाजत आले होते… वातावरण इतकं प्रसन्न, गार आणि शांत होतं की, पुण्यातल्या मे महिन्याने हे वाचलं तर त्यालाच inferiority complex येईल! 😄[ पुण्यात त्या वेळी ४०° तापमान होत आणि हेलसिंकीमध्ये १० °.] 
७ किंवा ९ नंबरची ट्राम मला चालणार होती. १० मिनीटात ती आली… मी सामानासकट कसंबसं चढले… आणि शेवटच्या सीटवर जाऊन बसले.
…आणि इथे माझा “international pro traveller” फुगा फटकन फुटला. 😄
समोरच्या डिजिटल बोर्ड वरची स्टेशन ची नाव वाचण्याचा मी जीव तोडून प्रयत्न करत होते…
 पण फिनिश भाषा माझ्याकडे बघून जणू म्हणत होती —
 “मॅडम, तुपलं आपलं काही इतक्यात जुळेल अस वाटत नाही!” 😄
बहुतेक माझ्या चेहऱ्यावर “काला अक्षर भैंस बराबर” हे भाव स्पष्ट दिसले असावेत…कारण समोर बसलेल्या एका गृहस्थांनी मला हसून विचारलं —
“Are you new in Finland?”
मीही कसनुसं हसत म्हटलं — “Yes… and I am unable to understand the language!” [ मदत मागितल्याशिवाय कशी मिळणार? म्हणून पटकन अडचण सांगून टाकली ] 
त्यांनी कुठे उतरायचं विचारलं. मी हॉटेलचं नाव सांगितल्यावर ते म्हणाले — “Oh! There is some road repair work going on… so the tram is taking a different route for two three days” ...अरे माझ्या कर्मा. ह्यालाच बहुतेक देवाचे परफेक्ट टाइमिंग म्हणत असावेत! 😄
माझा चेहरा त्या क्षणी चांगलाच पडला असावा… कारण लगेच ते हसून म्हणाले — “Don’t you worry dear… I am getting down there too. I will show you the way.”
आणि अक्षरशः त्या वेळी — “जीव भांड्यात पडणे” ह्या मराठी म्हणीचा इंटरनेशनल अनुभव घेतलेली मी पाहिली स्त्री ठरलेअसेन! 😄
स्टेशन येईपर्यंत भरपूर गप्पा झाल्या. नवीन देशातला तो पहिला अनोळखी माणूस…..पण त्याच्या साध्या, स्वतः होऊन केलेल्या मदतीने मनातली सगळी भीती विरघळून गेली. असे प्रसंग आपल्याला त्या देशाशी, तिथल्या संस्कृतीशी एकरूप व्हायला मदत करतात...उतरल्यावर तो मला हॉटेलपर्यंत सोडायला आला….. आणि “I stay nearby” असं सहज सांगून हसत निघून गेला.
त्या क्षणी मात्र पुन्हा जाणवलं — भाषा वेगळ्या असू शकतात… देश वेगळे असू शकतात…..पण माणुसकीचा अर्थ जगभर सारखाच असतो… ❤️…
खरच, नकाशे रस्ते दाखवतात खरे…
पण प्रवास सुखरूप सुंदर आणि अविस्मरणीय करून दाखवतात ती अशी अनपेक्षितपणे भेटणारी चांगली माणसं…❤️
आणि मग....
“किसी की मुस्कुराहटों पे हो निसार…
 किसी का दर्द मिल सके तो ले उधार…” असे गुणगुणत हॉटेलमध्ये शिरले…
 हॉटेलच्या दरवाज्यावरचा डायनासोरसारखा चेहरा पाहून क्षणभर वाटलं — “आपलं स्वागत होतंय की परीक्षा घेतायत?” 😄
 पण आत गेल्यावर मात्र सगळीकडे इतकी उबदार आणि welcoming vibe होती, की प्रवासाचा सगळा थकवा क्षणात पळून गेला…रूमवर जाऊन…
 गेल्या गेल्या मस्त गरमागरम सूप करून प्यायल आणि गुळाची पोळी खाल्ली....आणि मग अशी ताणून दिली की शरीरानेच जणू जाहीर केलं — “आता पुरे adventure आजच्या दिवसासाठीच ” 😄
पण मन मात्र झोपायच्या आधीही उत्साहाने धावत होतं…
 कारण उद्यापासून सुरू होणार होती
 या आनंदी देशातल्या — हेलसिंकी शहराची सफर…
 इथली माणसं, इथलं शांत सौंदर्य… ..आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जगभर चर्चेत असलेली त्यांची शिक्षणपद्धती जवळून अनुभवायची होती…!
“ख्वाबों के परिंदे उड़ने लगे हैं…
आँखों में अब भी कुछ सपने जगे हैं…"
…आणि त्या स्वप्नांच्या हलक्या पंखांवर स्वार होऊन मी अलगद झोपेच्या देशात निघून गेले…
उद्याच्या हेलसिंकी सफरीची सुंदर स्वप्नं मनात घेऊन…!

Comments

  1. क्या बात हैं! प्रगती तुझ्या बरोबर वाचकांना घेऊन जाण्याची क्षमता तुझ्या लेखणीत आहे.मस्त!!!!

    ReplyDelete
    Replies
    1. प्रगती जोशीJune 10, 2026 at 6:10 PM

      माझ्या लिखाणच मनापासून कौतुक केल्यामुळे मलाही लिहायला हुरूप येतो! धन्यवाद 🙏

      Delete
  2. Replies
    1. प्रगती जोशीJune 10, 2026 at 7:37 PM

      हो ना!! सुरेखच दिसतात ना!!😍

      Delete
  3. वाह, तुझे ब्लॉग वाचून मला solo la जाण्याचा मोह होऊ लागलाय. भन्नाट लिहिले आहेस तू, तिकडे आपण नीट विचारले की मदत छान मिळते हा माझाही अनुभव आहे, eagerly waiting for your next write up...

    ReplyDelete
    Replies
    1. प्रगती जोशीJune 15, 2026 at 6:24 AM

      अग तुम्ही इतक्या आत्मियतेने वाचता आहात त्यामुळे लिहायला खरच हुरूप येतो आहे!! आपण दोघी जाऊ यात. ..पण त्याला सोलो नाही म्हणता येणार...पण पुढच्या वेळी मला bagpack म्हणतात ते करायचे आहे....जायचे का सांग?

      Delete
    2. एका पायावर तयार आहे मी

      Delete
    3. प्रगती जोशीJune 19, 2026 at 3:42 AM

      करूया प्लान 😊

      Delete
  4. तुझ्याबरोबर फिरतेय असं वाटलं. मस्त लिहिलं आहेस. शिक्षकांबद्दल इतकं कौतुक आपल्या देशात वाटलं लोकांना तर???असं स्वप्नरंजनही केलं वाचता वाचता.

    ReplyDelete
    Replies
    1. प्रगती जोशीJune 15, 2026 at 6:27 AM

      थँक्स! हो ना ग आपल्याकडे हे स्वप्नरंजन आहे .... कदाचित आपल्याकडे ह्याच्या उलट येणारे अनुभव आपल्या ह्या वाटण्याला कारणीभूत असतिल!!

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

प्र चा एकल प्रवास.... एकला चलो रे ....

प्र चा एकल प्रवास....

प्र चा एकल प्रवास....पॅलेस,नोबेल प्राईझ म्युझियम, निळाई आणि मी!!